भीमसैनिक नितीन शिरसाठ हत्येतील आरोपी अजून मोकाट…१२ मार्चला आंबेडकरी चळवळीचा एल्गार..न्यायासाठी भीमसैनिक एकवटणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे भीमसैनिक नितीन शिरसाठ यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आलेल्या घटनेला अनेक दिवस उलटून गेले असतानाही या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नसल्याने आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या हत्येतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी,अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने येत्या १२ मार्च २०२६ (गुरुवार) रोजी दुपारी ११.३० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
नितीन शिरसाठ यांच्या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी समाज संघटित होत असल्याचे चित्र दिसत आहे.आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून गुन्हेगारांना त्वरित अटक करावी आणि कठोर कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी ठाम भूमिका स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीने घेतली आहे.या निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून भीमसैनिक नितीन भाऊ शिरसाठ यांच्या हत्येला न्याय द्यावा,अशी मागणी करण्यात येणार आहे.तसेच या आंदोलनात चळवळीतील सर्व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.
