भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या विकृत प्रवृत्तीला धडा शिकवणार..! पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय..’वंचित’ चा आंदोलनाचा पवित्रा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील रामजी सपकाळ यांच्याबद्दल फेसबुकवर अत्यंत हीन दर्जाची,अश्लील आणि विखारी पोस्ट करणाऱ्या ‘विकास देवकर’ नावाच्या विकृत प्रवृत्तीच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “महापुरुषांची विटंबना करणाऱ्या अशा विकृत व्यक्तीची आता खैर नाही,” असा कडक इशारा प्रशासनाने दिला असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सायबर क्राईम विभागाला तात्काळ गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीला ताब्यात घेताच त्याच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
१० मार्च २०२६ रोजी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर सेलने तांत्रिक तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी रात्री ९:३० च्या सुमारास ‘विकास देवकर’ या फेसबुक प्रोफाईलवरून संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील आणि विडंबनात्मक विधान करण्यात आले होते. या पोस्टमुळे संपूर्ण आंबेडकरी जनता आणि समाजमनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा हा जाणीवपूर्वक कट असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी सायबर सेलला तपासाचे आदेश देताना स्पष्ट केले की, “आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केल्यानंतर, त्याच्यावर SC/ST ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत (महापुरुषांचा अपमान आणि जातीवाचक द्वेष पसरवणे) कठोर कारवाई केली जाईल.”वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. “महापुरुषांचा अवमान करणाऱ्या अशा प्रवृत्तींना ठेचणे गरजेचे आहे. जर पोलिसांनी या विकृत आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या नाहीत, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल. या दरम्यान उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील,” असे साठे यांनी ठणकावून सांगितले.
सध्या अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सागर सोमनाथ डिकले हे या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, आरोपीचा IP Address ट्रेस करण्याचे काम सुरू आहे.यावेळी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, देविदास भालेराव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
