crime ‘तिथे’ अंधारात फुलत होती ‘अफू’ची शेती… स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात तब्बल ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे प्रतिबंधित अफू गवताची शेती करून त्याचे संवर्धन करणाऱ्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व कर्जत पोलीस स्टेशनच्या पथकाने धडक कारवाई करत जेरबंद केले आहे.या कारवाईत पोलिसांनी तब्बल 47 लाख 64 हजार 180 रुपये किमतीची 238.239 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून,जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत ही मोठी कारवाई मानली जात आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची लागवड व विक्री करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
यानुसार पोउपनि.अनंत सालगुडे,समीर अभंग यांच्यासह पोलीस अंमलदार दीपक घाटकर,विजय पवार, अतुल लोटके,संतोष खैरे,अमृत आढाव,चालक उत्तरेश्वर मोराळे व अर्जुन बडे हे कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत परमेश्वर बन्सी घनवट (वय 68, रा. चापडगाव ता. कर्जत) हा त्याच्या शेतात शासनाने प्रतिबंधित केलेल्या अफू झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन करत असल्याची माहिती मिळाली.ही माहिती पोनि. किरणकुमार कबाडी यांना कळविण्यात आली.त्यांच्या सूचनेनुसार पथकाने कर्जत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कर्जत पोलीस स्टेशन येथे जाऊन सपोनि.विजय झंजाड यांना लेखी माहिती दिली. त्यानंतर सपोनि विजय झंजाड व पोलीस अंमलदार संजय सानप, किरण जाधव,सचिन थोरात यांच्यासह सरकारी वाहनाने चापडगाव शिवारातील शेती गट क्रमांक 13 येथे छापा टाकण्यात आला.पोलिसांनी शेताची पाहणी केली असता एक इसम शेतात राखण करताना दिसून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव परमेश्वर बन्सी घनवट असल्याचे सांगितले.पुढील चौकशीत त्याने शेतात लावलेले गवत हे अफूचे असून ते दोन ते तीन महिन्यांपूर्वी लावले असून त्यास पाणी व खते देऊन जोपासना करत असल्याची कबुली दिली.यानंतर पोलिसांनी शेतातून 238.239 किलो वजनाची प्रतिबंधित अफूची झाडे जप्त केली असून त्याची किंमत 47,64,180 रुपये इतकी आहे.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोना.शामसुंदर अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 93/2026 दाखल करण्यात आला असून गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा 1985 चे कलम 8(क), 15(क) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे.
