अहिल्यानगरात भक्तीचा महासागर..! संत किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीला भाविकांची मोठी गर्दी..पारायणातून मिळाली आध्यात्मिक ऊर्जा ‘गुरुभक्ती’ भजन संध्येत भाविक मंत्रमुग्ध
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील संत किसनगिरीनगर येथील ‘गुरु दत्त भक्तिधाम’ येथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. ‘ज्ञानबा-तुकाराम’ तसेच ‘सद्गुरू किसनगिरीबाबा’ यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.देवगड संस्थानचे प्रातःस्मरणीय प.पू. गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि स्वामी प्रकाशानगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या भक्तिधामात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय रेलचेल पाहायला मिळाली.

सोहळ्याची सुरुवात पहाटे मंगलमय वातावरणात श्रींच्या अभिषेकाने व नित्यपूजेने झाली. त्यानंतर भाविकांनी ‘श्री किसनगिरी विजय’ या पवित्र ग्रंथाचे सामुदायिक पारायण मनोभावे केले.या ग्रंथपारायणामुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.दुपारी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने घेतला. महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावत भक्तीभावाने प्रसाद ग्रहण केला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रात्री ९ ते ११ या वेळेत झालेली ‘गुरुभक्ती भजन संध्या’. श्री गोरक्षनाथ दुतारे महाराज यांच्या सुश्राव्य भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. त्यांच्या सुमधुर गायनामुळे भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.या सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यामध्ये महापौर ज्योती गाडे,माजी जिल्हापरिषद सदस्य सचिन जगताप,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली बारस्कर, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, किरण बारस्कर,जालिंदर बोरुडे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.यावेळी नगर भक्त मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा नगर भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते.या भव्य पुण्यतिथी सोहळ्यामुळे भिस्तबाग परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणाने भारावून गेला होता.
