शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर निमगाव प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना..जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात शाळा विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प
श्रीरामपूर (वार्ताहर):- श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील निमगाव प्राथमिक शाळेत शासनाच्या निर्देशानुसार तसेच शाळेच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यासाठी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक यादव गायधने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी दिपक त्रिभुवन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षिका सुधा गमे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षीय निवड मीना निकम यांनी सुचवली, तर प्रतिभा भिसे यांनी त्यास अनुमोदन दिले.
या वेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे फेटा बांधून औक्षण करण्यात आले व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना गावातील शाळेतच प्रवेश द्यावा व आगामी शताब्दी महोत्सवी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे दिपक त्रिभुवन यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांमधून सरपंच दत्तात्रय झुराळे, दत्तात्रय सगम, शिवाजी शेजूळ, चंद्रभान वाघ, दिलीप भागडे, विलास शेजूळ, मधुकर कदम, ह.भ.प. दादासाहेब रंजाळे, लहानू शेजूळ, मेजर बाळासाहेब भागडे यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात यादव गायधने गुरुजी यांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी शाळा विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस यांनी उपस्थितांचे आभार मानले.या वेळी माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी विलास शेजूळ, उपाध्यक्षपदी रेवणनाथ झुराळे, कोषाध्यक्षपदी बाळासाहेब भागडे, सचिवपदी संतोष वाघमोडे यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार सदस्य म्हणून शिक्षिका प्रतिभा भिसे, पालक प्रतिनिधी वेणूनाथ कालंगडे, सेवानिवृत्त अधिकारी मधुकर कदम, सेवानिवृत्त शिक्षक सुधीर भागडे यांचा समावेश करण्यात आला.सदस्य म्हणून ह.भ.प. दादासाहेब रंजाळे, सुरेश कालंगडे, विक्रमसिंग परदेशी, शिवाजी शेजूळ, चंद्रभान वाघ, दिलीप भागडे, सुभाष गायकवाड, गणेश भाकरे, भाऊसाहेब पंडित, ज्ञानदेव आगलावे, दत्तात्रय सगम, अमोल कालंगडे, भाऊसाहेब शेजूळ, भिमराव कोठुळे, रावसाहेब शेजूळ, संतोष भागडे, अलका साबळे यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस, उपाध्यक्ष महेंद्र साबळे, सरपंच दत्तात्रय झुराळे, उपसरपंच विजयसिंग परदेशी यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष वाघमोडे तसेच शिक्षिका प्रतिभा भिसे, मीना निकम, सुधा गमे यांनी विशेष परिश्रम घेतले.
