“गॅस टंचाईच्या अफवा थांबवा..! जिल्ह्यात एलपीजीचा भरपूर साठा” जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे स्पष्ट आदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- जिल्ह्यात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरत असताना प्रशासनाने यावर स्पष्ट भूमिका घेतली असून जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिली आहे.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले. जिल्ह्यातील गॅस गोदामांची विशेष पथकामार्फत अचानक तपासणी करण्यात यावी आणि कृत्रिम टंचाई निर्माण करून नागरिकांची गैरसोय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, बीपीसीएल कंपनीचे राजकुमार मिश्रा तसेच विविध गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी आणि गॅस वितरक उपस्थित होते.सध्या जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राहकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. गॅसचे वितरण नियमानुसार होत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच गॅसची ऑनलाईन नोंदणी करून अधिकृत पुरवठादारांकडूनच सिलिंडर घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गॅस वितरणासंदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या १८००२२४३४४, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या १८००-२३३३-५५५, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या १८००-२३३३-५५५ या टोल-फ्री क्रमांकांवर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.दरम्यान, गॅस एजन्सींनी सिलिंडरचा पुरवठा वेळेत व नियमानुसार करावा, वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी आणि ग्राहकांना वेळेवर सेवा मिळेल यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. प्रशासन गॅस पुरवठा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
