Election..महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जागांसाठी..राहुरी–बारामती पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला..!
अहिल्यानगर/पुणे प्रतिनिधी:-राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागलेल्या राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (ता.१५) तामिळनाडू,पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांसह महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील बारामती या दोन्ही मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून,सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार राजकीय सामना रंगतो की निवडणूक बिनविरोध होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे १७ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते.त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.दुसरीकडे, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत निधन झाल्याने बारामती विधानसभा मतदारसंघही रिक्त झाला. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान,बारामती मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.तर राहुरी मतदारसंघात भाजपकडून अक्षय कर्डिले यांचे नाव पुढे येत असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात रंगतदार लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ही निवडणूक जाहीर करताना केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.त्यांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.दरम्यान,राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ पार पडला.या कार्यक्रमाला उपस्थित असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोटनिवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.त्यांनी सांगितले की, राहुरी आणि बारामती या दोन्ही जागांवरील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी,अशी आमची इच्छा आहे.सर्वांनी एकमताने निर्णय घेतला,तर ते राज्याच्या राजकीय संस्कृतीसाठी चांगले ठरेल.मात्र,जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली,तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत,असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.दरम्यान,या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकते.त्यामुळे आगामी काही दिवसांत उमेदवार जाहीर होणे,प्रचाराची रणधुमाळी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
