मोबाईल-रोख रक्कम चोरीचा उलगडा नगर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई..अथक पाठलागाला यश चोरटे जेरबंद..मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादीला मोठा दिलासा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.या कारवाईत चोरीस गेलेला सुमारे ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीस परत देण्यात आला आहे.या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. 114/2026 दाखल असून, भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 309(4), 309(6), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादी बाळासाहेब काशिनाथ कदम (रा.कोथरुळ, ता.माजलगाव,जि.बीड) यांचा मोबाईल फोन व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.तांत्रिक विश्लेषण,मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.अथक प्रयत्नांनंतर आरोपींना अटक करण्यात आली.अटक केलेल्या आरोपींकडून एकूण अंदाजे ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यात वनप्लस कंपनीचा मोबाईल,मोबाईल चार्जर तसेच रोख रक्कम यांचा समावेश आहे.हस्तगत करण्यात आलेला सर्व मुद्देमाल मा. न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी बाळासाहेब कदम यांना परत सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.ही यशस्वी कारवाई नगर तालुका पोलीस ठाणे सपोनी. गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, पोहेकॉ.मंगेश खरमाळे,पोकॉ.विक्रांत भालसिंग,सफौ.दत्तात्रय हिंगडे,पोहेकॉ.नितीन शिंदे, मपोकॉ.नंदीनी झिने तसेच दक्षिण मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांनी संयुक्तरित्या पार पाडली.नगर तालुका पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
