उपमहापौर धनंजय जाधव यांची तुळजा भवानी चरणी भावपूर्ण हजेरी..शहराच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगरचे उपमहापौर श्री.धनंजय कृष्णा जाधव यांनी नुकतीच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पवित्र चरणी हजेरी लावत मनोभावे दर्शन घेतले. धार्मिक वातावरणात आणि भक्तिमय भावनेने ओतप्रोत भरलेल्या या भेटीत जाधव यांनी सहकुटुंब मंदिरात उपस्थित राहून देवीसमोर नतमस्तक होत श्रद्धा व्यक्त केली.तुळजापूर येथील सुप्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करताच “आई राजा उदो उदो” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.या भक्तिमय वातावरणात जाधव यांनी विधिवत पूजा-अर्चा करत देवीचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी अहिल्यानगर शहरातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी देवीचरणी प्रार्थना अर्पण केली.
मंदिरातील पारंपरिक विधीनुसार पूजा पार पाडल्यानंतर जाधव कुटुंबीयांनी काही वेळ ध्यानधारणाही केली. त्यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भाविकांनीही उपमहापौरांसोबत संवाद साधत शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मंदिराचे पुजारी श्री.विश्वजीत कदम पाटील यांनी जाधव यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. मंदिर प्रशासनाकडूनही त्यांच्या भेटीचे स्वागत करण्यात आले.उपमहापौर जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आई तुळजाभवानी ही आमची कुलस्वामिनी असून तिच्या आशीर्वादानेच सर्व कार्य यशस्वी होत असतात.शहरातील नागरिकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची शक्ती देवीकडून मिळते.”दरम्यान, जाधव यांच्या या धार्मिक भेटीमुळे अहिल्यानगरमध्येही समाधानाचे वातावरण असून, अनेकांनी त्यांच्या श्रद्धाभावाचे कौतुक केले आहे.त्यांच्या या दर्शनामुळे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सकारात्मक संदेश गेल्याचेही बोलले जात आहे.
