गरिबांच्या हक्काच्या घरावर डल्ला? ‘पंतप्रधान आवास योजने’तील लुटी विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र आक्रमक..मनपा प्रशासनाला १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-महानगरपालिकेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या ‘पंतप्रधान आवास’ योजनेवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.या योजनेत पारदर्शकतेचा अभाव असून गरिबांची लूट केली जात असल्याचा खळबळजनक आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने केला आहे.या संदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने आज अतिरिक्त आयुक्त (२) कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन प्रशासनाला धारेवर धरले.महानगरपालिका तिसगाव, सुंदरवाडी,पडेगाव आणि हर्सूल येथे ११,१२० घरांचे स्वप्न दाखवत आहे. मात्र,तांत्रिक कारणास्तव घर नाकारणाऱ्या लाभार्थ्यांच्या अनामत रकमेतून GST आणि प्रशासकीय शुल्काच्या नावाखाली कपात केली जात आहे.हा प्रकार नियमबाह्य असून,ही रक्कम १०% व्याजासह २ दिवसांत परत करावी,अशी आक्रमक भूमिका पक्षाने घेतली आहे.”एकाच बिल्डरला (एलोरा कन्स्ट्रक्शन) तीन मोठ्या ठिकाणची कामे कोणत्या निकषावर दिली?” असा सवाल जिल्हाप्रमुख दिनेश गवळे यांनी उपस्थित केला आहे.
घरांच्या किमती अवास्तव वाटत असून, प्रशासनाने यावर तात्काळ ‘श्वेतपत्रिका’ काढावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. १०% ऐवजी ५% रक्कम भरण्याची सवलत द्या.दुहेरी बोजा टाळा:घराचा ताबा मिळाल्यावरच बँकेचे हप्ते सुरू करा,जेणेकरून भाडे आणि हप्ता असा दुहेरी ताण पडणार नाही.एक खिडकी योजना:कर्ज प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना हेलपाटे मारायला लावू नका.लेखी हमीपत्र:रस्ते,पाणी आणि ड्रेनेज सुविधांबाबत प्रशासनाने लेखी हमी द्यावी.येत्या १५ दिवसांत प्रशासनाने यावर ठोस कार्यवाही केली नाही,तर हजारो लाभार्थ्यांसह महानगरपालिकेवर तीव्र जन-आंदोलन किंवा बेमुदत उपोषण छेडले जाईल,असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती,जिल्हा सरचिटणीस रविकांत मोरे,शहराध्यक्ष रणजीत मनीरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि महिला लाभार्थी उपस्थित होत्या.
