चोरीचे सोने घेणाऱ्या सराफालाही आरोपी करा..पीडित महिलेचा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेवगाव येथील एका महिला प्रवाशाचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला पोलिसांनी गजाआड केले असले,तरी चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाला मात्र अद्याप कायदेशीर कचाट्यातून मोकळे सोडण्यात आले आहे.”चोरी करणाऱ्या इतकाच चोरीचा माल घेणाराही दोषी असतो,अशी भूमिका घेत फिर्यादी मीना बडाख यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.या प्रकरणी सराफाला आरोपी न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.४ एप्रिल रोजी शेवगाव येथील रहिवासी मीना बडाख या पुणे ते अहिल्यानगर असा प्रवास करत होत्या.या प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या महिलांनी हातचलाखीने लंपास केले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच बडाख यांनी तत्काळ नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती.
तपासात धक्कादायक खुलासा कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून माया कल्याण भोसले हिला ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच तिने चोरीची कबुली दिली.मात्र,तपासात पुढे आलेली माहिती अधिक धक्कादायक होती.माया भोसले हिने चोरलेले दागिने स्वतःकडे न ठेवता बोधेगाव येथील सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे याला विकले होते. पोलिसांनी आदापुरे याच्याकडून चोरीचे सोने जप्त देखील केले आहे.मीना बडाख यांनी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले आहे.पोलिसांनी केवळ चोरी करणाऱ्या माया भोसले हिलाच आरोपी केले आहे.
चोरीचा माल विकत घेणारा सराफ दुकानदार हा गुन्ह्यातील तितकाच मोठा भागीदार आहे.माल जप्त होऊनही त्याला आरोपी का करण्यात आले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.“गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी भागवत आदापुरे याला आरोपी करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. जर पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात सहआरोपी केले नाही, तर मला आणि माझ्या कुटुंबाला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल,” असा इशारा मीना बडाख यांनी दिला आहे.चोरीचा माल घेणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीमुळे आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे सराफ बाजारपेठेत चोरीचे सोने घेणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
