कोतवाली पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे माझे सोने परत मिळाले-मिनाबाई बडाख..चोरीचे सोने घेणाऱ्या ‘त्या’ सराफाला वाचवण्यासाठी काहींचा स्टंट..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बस प्रवासात चोरीला गेलेले २२ तोळे सोने कोतवाली पोलिसांनी तत्परतेने शोधून काढले असले तरी, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी पीडित महिलेने आक्रमक पवित्रा घेतला असून, दुसरीकडे पोलिसांच्या कायदेशीर कारवाईत अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.नेवासा तालुक्यातील करजगाव येथील मिनाबाई ज्ञानदेव बडाख या ७ एप्रिल २०२६ रोजी पुणे-पाथर्डी बसने प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेतून २२ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. कोतवाली पोलिसांनी तांत्रिक तपास करून माया कल्याण भोसले (रा. हादगाव, ता. शेवगाव) हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने हे सोने बोधेगाव येथील सराफ भागवत मधुकर आदापुरे याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी कायदेशीर पंचनामा करून २० तोळे सोने जप्त केले आहे.
“जर सराफांनी चोरीचे सोने खरेदी करणे थांबवले, तर चोऱ्यांचे प्रमाण निम्म्याने कमी होईल,” असे स्पष्ट मत मिनाबाई बडाख यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की, चोरीचे सोने घेणाऱ्या सराफाला या गुन्ह्यात सहआरोपी करावे. ही मागणी मान्य न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोतवाली पोलिसांनी अत्यंत निष्पक्षपातीपणे तपास करून मुद्देमाल हस्तगत केला असताना, काही विशिष्ट व्यक्तींकडून पोलिसांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे. पोलीस जेव्हा चोरीचे सोने जप्त करण्यासाठी जातात, तेव्हा तिथे जाऊन पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, सराफांची चुकीची दिशाभूल करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, अशा स्वरूपाच्या नोंदी यापूर्वी सातारा आणि वालचंदनगर पोलीस ठाण्यांत झालेली आहे.महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार, पोलीस आणि सुवर्णकार यांच्यात सुसंवाद राहावा यासाठी ‘सुवर्णकार दक्षता समिती’ स्थापन करण्यात आली आहे. मात्र, सध्या जे लोक पोलिसांच्या कारवाईला विरोध करत उपोषण करत आहेत, त्यांचा किंवा त्यांच्या संघटनेचा या अधिकृत समितीशी कोणताही संबंध नसल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. केवळ वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी हे लोक सर्वसामान्य सुवर्णकार बांधवांची दिशाभूल करत असल्याची चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.
“कोतवाली पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे माझे सोने परत मिळाले, पण चोरीचा माल घेणाऱ्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे. अशा सराफांना पाठीशी घालणाऱ्यांचा बुरखा फाडणे गरजेचे आहे.”- मिनाबाई बडाख (पीडित महिला)
