घराखाली ‘गुप्तधन’ असल्याचे आमिष दाखवून ५० हजारांचा गंडा..भोंदू मांत्रिक तोफखाना पोलिसांकडून गजाआड!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील सर्जेपुरा भागात गुप्तधनाचे आमिष दाखवून एका कुटुंबाची ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू मांत्रिकाला तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.शिव अण्णासाहेब सोनावणे (रा.सर्जेपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिव सोनावणे हा फिर्यादीच्या शेजारीच वास्तव्यास आहे.त्याने फिर्यादीच्या घरात मोठ्या प्रमाणात ‘गुप्तधन’ गाडलेले असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.हे धन काढून देण्यासाठी त्याने घरात पूजा आणि विविध तांत्रिक विधी करण्याचे नाटक केले. या विधींच्या बहाण्याने त्याने फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ५० हजार रुपये उकळले. मात्र, बराच काळ उलटूनही काहीच हाती न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे पीडित कुटुंबाच्या लक्षात आले.फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच पीडित कुटुंबाने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी शिव सोनावणे याला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात आरोपीने आणखी किती जणांना अशा प्रकारे फसवले आहे, तसेच त्याचे कोणी साथीदार आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी दिली.सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ,पोलीस अंमलदार भानुदास खेडकर,सुमित गवळी आणि सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
