नाशिक पोलीस परिक्षेत्राचे महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची बदली त्यांच्या जागी प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे नवे ‘आयजी’
विशेष (प्रतिनिधी):-नाशिक पोलीस परिक्षेत्राच्या वरिष्ठ स्तरावर मोठी फेरबदल करण्यात आली असून, आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता प्रशासकीय आणि प्रशिक्षण क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेले श्री. प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे नवे कारभारी म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत.
नाशिक परिक्षेत्राचा कार्यभार अत्यंत सक्षमपणे सांभाळणारे दत्तात्रय कराळे यांची आता विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग (मुंबई) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारी नियंत्रण आणि पोलीस प्रशासनात आणलेली शिस्त यामुळे त्यांचा नावलौकिक राहिला आहे. आता राज्य स्तरावर मानवी हक्कांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल.
नाशिक परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून श्री. प्रवीण पडवळ यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते ‘विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण)’ म्हणून कार्यरत होते. पोलीस दलातील विविध पदांचा प्रदीर्घ अनुभव आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर असेल.
दत्तात्रय कराळे यांच्या रूपाने नाशिकला लाभलेला एक जनसामान्यांचा अधिकारी आता राज्य स्तरावर सेवा देणार.प्रवीण पडवळ यांच्या नियुक्तीमुळे नाशिक परिक्षेत्रातील पोलीस दलाला नव्या प्रशिक्षणाची आणि आधुनिक कार्यपद्धतीची जोड मिळण्याची शक्यता.नाशिक परिक्षेत्रातील पोलीस दलात या बदलाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, नूतन महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज झाले आहे.
