‘त्या’ धाडसी तरुणीचा ‘तो’ व्हिडिओ आणि विकृत ‘बंटी’ गजाआड..’एलसीबी’ने अश्या आवळल्या मुसक्या..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या एका विकृत रोडरोमिओला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने बेड्या ठोकल्या आहेत.पीडित तरुणीने धाडस दाखवून या प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला आणि तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला होता.या व्हिडिओची दखल घेत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.बंटी उर्फ संकेत ससाणे (रा.सिद्धार्थनगर,अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.दि.२० मे रोजी रात्री ०९:०० ते ११:०० वाजेच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीला भेटून ॲक्टिव्हा गाडीवरून व्ही स्टार हॉटेल समोरील रस्त्याने घरी जात होती. एका अनोळखी इसमाने त्याच्या मोटारसायकल वरून तरुणीचा पाठलाग सुरू केला.त्याने अश्लील हातवारे करून व बोलून तरुणीची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.सदर प्रसंगी घाबरून न जाता पीडित तरुणीने अत्यंत धाडस दाखवले.तिच्या सोबत घडणाऱ्या या सर्व प्रकाराचा तिने स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला.त्यानंतर तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केला आणि ‘व्हिडिओमधील या इसमास कोणी ओळखत असेल तर त्याचे नाव कळवा’ असा मेसेज पोस्ट केला.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.सोशल मीडियावरील हा व्हिडिओ समोर येताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांना दिले.आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर शहरात शोधमोहीम सुरू केली.

पोलीस पथकाने व्यावसायिक कौशल्य आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने व्हिडिओतील संशयित आरोपीचा माग काढला.संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता,त्याने आपले नाव बंटी उर्फ संकेत ससाणे असल्याचे कबूल केले.तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली.या आरोपीने अशाच प्रकारे आणखी एका तरुणीसोबत छेडछाडीची घटना घडवून आणली होती. त्याबाबतही तक्रार प्राप्त झाल्याने,तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गु.र.नं. ३७७ आणि ३७८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७८ आणि ७९ अन्वये एकाच वेळी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
