पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार खपवून घेणार नाही.. प्रत्येक तालुक्यात समानतेने इंधन वाटप करा..! जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे कडक निर्देश..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पेट्रोल,डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी,तसेच प्रत्येक तालुक्यात इंधनाचे समानतेने वाटप करावे,असे कडक निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्याबाबत एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.
अपुऱ्या पुरवठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’
या महत्त्वपूर्ण बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्यासह विविध इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल साठा,पुरवठा व्यवस्था,वाहतूक समन्वय तसेच विविध तालुक्यांतील इंधन उपलब्धतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.पुणे आणि मनमाड येथील इंधन डेपो निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना इंधनाचा अविरत पुरवठा होईल याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.इंधन टंचाईमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये,यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.इंधन वाटपाच्या वेळी पंपांवर गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी पेट्रोल पंप परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात यावी,असे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांना सुरळीत सेवा मिळणे आवश्यक आहे.पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.
