तरुणाला बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देत टोळीचा जीवघेणा हल्ला..!पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. आरोपींना पकडण्यात पोलीस अद्यापही अपयशी
पाथर्डी (प्रतिनिधी):-पाथर्डी तालुक्यातील शेवगाव रस्त्यावर एका तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत,नऊ जणांच्या टोळीने कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना रविवार,दि.२५ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी मंगळवार,दि.२६ मे रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, घटनेला दिवस उलटूनही पाथर्डी पोलिसांना अद्याप एकाही आरोपीला अटक करता आलेली नाही.तुषार चव्हाण असे या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी शुभांगी साईनाथ चव्हाण (वय २०,रा. शेवगाव रोड, पाथर्डी) हिने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी शुभांगी चव्हाण हिने दिलेल्या माहितीनुसार,ती सध्या तिच्या आई आणि आजी सोबत शेवगाव रोड,पाथर्डी येथे राहते. रविवार २५ मे रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास ती शेवगाव रोडवरील हॉटेल मधुबन जवळ असलेल्या ‘समर्थ किराणा’ दुकानातून सामान घेऊन बाहेर आली.त्याच वेळी शेवगाव बाजूकडून एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या टोळीने तिच्यावर हल्ला केला. यामध्ये संशयित आरोपी:
१) पप्पू लाल्या भोसले
२) गुंग्या लाल्या भोसले
३) विशाल हंबड्या काळे
४) गुड्डी हंबड्या काळे (सर्व रा. बाभळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर)
५) प्रल्हाद गहिनीनाथ मुरकुटे (रा. आष्टी, जि. बीड)
यांच्यासह अन्य ३ ते ४ अनोळखी इसमांचा समावेश होता.दुकानाबाहेर पडताच पप्पू भोसले,विशाल काळे आणि गुड्डी काळे यांनी शुभांगीचा हात धरून तिला बळजबरीने ओढून नेण्याचा (अपहरण करण्याचा) प्रयत्न केला. “तुला किडनॅप करून विकून टाकतो,” अशी धमकीही त्यांनी दिली.शुभांगीला बळजबरीने घेऊन जात असल्याचे पाहून तिचा मामेभाऊ तुषार आस्तान चव्हाण हा तिला सोडवण्यासाठी मध्ये पडला. याचा राग येऊन आरोपी पप्पू भोसले आणि विशाल काळे यांनी त्यांच्या हातातील कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने तुषारच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यामध्ये तुषार रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला.इतर आरोपींनी दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.घटनेनंतर जखमी तुषारला पाथर्डी पोलिसांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय, पाथर्डी येथे उपचारासाठी दाखल केले.मात्र,त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवले आहे.दिवसाढवळ्या रस्त्यावर बंदूक आणि कुऱ्हाडीच्या दांडक्याने एवढा मोठा जीवघेणा हल्ला होऊनही पाथर्डी पोलिसांना अद्याप आरोपींचा सुगावा लागलेला नाही.इतक्या गंभीर घटनेतील टोळी अजूनही मोकाट कशी? पाथर्डी पोलीस आरोपींना का शोधू शकत नाहीत? असे अनेक सवाल उपस्थित करत पाथर्डी तालुक्यातील नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तीव्र संताप आणि चर्चा व्यक्त होत आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.
