पुणे–नाशिक रेल्वेसाठी ९ ऑगस्टला ‘क्रांतीदिनी’ धडकणार जनआंदोलन! शिवप्रतिष्ठान आणि रेल्वे कृती समितीचा एल्गार!
विशेष वृत्त (प्रतिनिधी):-पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित पुणे–नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी आता लढा अधिक तीव्र झाला आहे.येत्या ०९ ऑगस्ट – क्रांती दिनाचे औचित्य साधून या रेल्वे मार्गासाठी पुणे–नाशिक महामार्गावर विराट जनआंदोलन आणि ‘चक्काजाम’ पुकारण्यात आला आहे.उद्योग,शेती, शिक्षण,पर्यटन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगाराचा पाया ठरणाऱ्या या ‘विकासाच्या महामार्गा’साठी सर्व नागरिकांनी रस्त्यावर उतरावे,असे आवाहन शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि पुणे–नाशिक रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे–नाशिक हा पट्टा उद्योग आणि कृषी क्षेत्रात राज्याचा कणा मानला जातो.उद्योग व रोजगार चाकण आणि नाशिक औद्योगिक क्षेत्राला जोडल्यामुळे व्यापार व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.खेड,आंबेगाव, जुन्नर,अकोले,संगमनेर आणि सिन्नर या शेतीप्रधान भागातील माल थेट आणि जलद गतीने बाजारात पोहोचवणे सोपे होईल.सर्वसामान्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल.क्रांतीदिनी पुणे–नाशिक महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या ६ मोक्याच्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे.हा केवळ एका भागाचा प्रश्न नसून आपल्या सर्वांच्या भविष्याचा आणि हक्काचा लढा आहे.आपल्या कुटुंबासह, मित्रांसह आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या लोकचळवळीत सहभागी होऊन आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवावा असे आवाहन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
