अहमदनगर प्रतिनिधी(दि.७ मार्च):-शहरातील मार्केटयार्ड परिसरात कंबरेला गावठी कट्टा खोसून तिथे गांजा ओढणार्या तरूणाला कोतवाली पोलिसांनी पकडले.जॉन कासिनो परेरा (वय 34 रा.चंदे बेकरी जवळ, बंगाल चौकी) असे पकडलेल्या तरूणाचे नाव आहे.त्याच्याकडून एक गावठी कट्टा,दोन जिवंत काडतुसे, चिलीम असा 15 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अंमलदार कैलास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परेरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी ६ मार्च रोजी दुपारी एक वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे,संदीप थोरात,सुजय हिवाळे,अमोल गाढे,कैलास शिरसाठ यांच्या पथकाची होळी सणानिमित्त हद्दीत गस्त सुरू होती. दरम्यान दुपारी पोलीस निरीक्षक यादव यांना माहिती मिळाली की,एक इसम कंबरेला शस्त्र लावून मार्केटयार्डमध्ये फिरत आहे. तो सध्या मार्केटयार्डमधील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या मागे गांजा पित बसला आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी गस्ती पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी छापा टाकला असता जॉन परेरा मिळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन काडतुसे मिळून आले आहेत.पोलिसांनी ते जप्त केले असून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
