संगमनेर प्रतिनिधी(दि.२६ मार्च):-मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात येवून ग्रामविकास अधिकार्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणार्याविद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंभोरे गावात ही घटना घडली.विशाल संजय गायकवाड (रा. अंभोरे, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे.विशाल गायकवाड हा शुक्रवारी ता. २४ मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत अंभोरे ग्रामपंचायतीमध्ये गेला व तेथे त्याने गाय गोठा यादी दाखविण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी अरुण जेजूरकर यांच्याकडे केली. जेजूरकर यांनी त्याला ‘तू आता दारुच्या नशेत आहेस, उद्या सकाळी ये’ असे म्हटले. याचाच राग येवून विशाल गायकवाड याने जेजूरकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.तू शिवीगाळ करु नकोस असे समाजावून सांगत असतांना गायकवाड याने जेजूरकर यांची शर्टची गचांडी पकडून धक्काबुक्की केली.त्यावेळी रामनाथ दशरथ बर्डे,गणेश भिमराज साळवे यांनी विशाल गायकवाड यास बाहेर काढले. तयावर गायकवाड याने ग्रामपंचायतीला कार्यालयाला बाहेरुन कडी लावून घेतली.त्यामुळे ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी यांना बाहेर पडण्यास अडथळा निर्माण करीत सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत ग्रामविकास अधिकारी अरुण जेजूरकर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार पोलिसांनी विशाल गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 164/2023 भारतीय दंड संहिता 353, 342, 323, 504, 506,427 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे करत आहे.
