पेट्रोलिंग दरम्यान कोतवाली पोलिसांनी पकडले तीन आरोपी;चोरीतील मुद्देमाल विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना अटक;एक दुचाकी,चार मोबाईलसह एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
अहमदनगर प्रतिनिधी(दि.५ जुन):-गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी कोतवाली पोलिसांनी आता रात्री दरम्यान पायी पेट्रोलिंग करायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत रात्री अपरात्री फिरून चोऱ्या, दादागिरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.शनिवारी (ता.३) कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी आणणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी तीन आरोपी येणार असल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान कोतवालीचे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक यादव यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार माळीवाडा वेशीजवळ मोबाईल विक्री करण्याकरिता आलेल्या लूकमान अरमान मदारी (वय २७ वर्षे,रा.बोरकेनगर,जुन्नर जि.पुणे) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून एक ॲप्पल आणि एक सॅमसंग असे ४० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.तसेच,काटवन खंडोबा येथे चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या अरबाज मदारी (वय २१ वर्षे, रा. बोरके नगर, जुन्नर जि. पुणे) याला ताब्यात घेवून २० हजार रुपये किमतीची होंडा ड्रिम सिटी मोटारसायकल जप्त करण्यात आली.तिसरी कारवाई सक्कर चौक येथे करण्यात आली असून चोरीतील मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या गणेश बाबासाहेब बोडके (वय १९, वर्षे रा.सारसनगर, अहमदनगर) याला ताब्यात घेवून ४० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. कोतवाली पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींवर चोरीचा मुद्देमाल बाळगून विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असल्याबाबत मुंबई पोलीस कायदा अन्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव,पोसई/मनोज कचरे, पोहेकॉ/तनवीर शेख,गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर,पोना/सलीम शेख,अभय कदम,संदीप थोरात,अमोल गाढे,सुजय हिवाळे,कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत,पोकॉ/सागर मिसाळ,पोकॉ/अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे.
नाईट पेट्रोलिंग सुरूच राहणार पोलीस निरीक्षक यादव
दहशत माजवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कोतवाली पोलिसांकडून सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.वेळेचे बंधन झुगारात रात्री विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात येत आहे.रात्री दरम्यान कोतवाली पोलिसांकडून पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून यादरम्यान अनेक गुन्हेगार हाती लागले आहेत.यापुढेही नाईट पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी यावेळी सांगितले.