अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ जुलै):-नगर शहरात तोफखाना पोलिसांनी मोठी कामगिरी केली असून बनावट आधारकार्ड तयार करून त्याद्वारे आयडिया व जिओ कंपनीचे सिमकार्ड विक्री केल्या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी सिमकार्ड विक्री करणाऱ्या अमोल अशोक टीळेकर यास अटक केली आहे.शहरातील पाईपलाईन रोड परिसरात राहणाऱ्या आरोहनगर येथे अमोल टिळेकर याच्या घरावर छापा टाकला असता तेथून बनावट आधारकार्ड वापरून शेकडो सिमकार्ड विशिष्ट लोकांना विक्री करण्यात आल्याचे समोर आल्याने आरोपी अमोल टिळेकर याची अधिक माहिती घेतली असता आरोपीचे प्रत्यक्षात दुकान नसून तो राहत्या घरातून आयडिया व जिओ कंपनीचे सिमकार्ड विक्री करणारा डीलर असल्याचे समोर आले आहे.त्याने विक्री करता आणलेले सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.आरोपी अमोल टिळेकर याने बनावट ग्राहकांची छायाचित्र वापरून,बनावट आधारकार्ड तयार करून अनेक सिमकार्ड वितरीत केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.या प्रकरणात अजूनही खूप मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे.
