कष्टकरी महिला आणि बालकांसाठी स्नेहवात्सल्य प्रकल्प एक आशा डॉ.हमीद दाभोळकर
अहमदनगर(प्रतिनिधी 30 जुलै):-बाळाचा जन्म झाल्यावर आईला घराच्या बाहेर जाऊन रोजगार मिळवता येत नाही. कामाला गेले तर बाळाची हेळसांड होते.अहमदनगरच्या पंचक्रोशीतील अशा कष्टकरी महिला आणि बालकांसाठी स्नेहवात्सल्य प्रकल्पाने एक आशा निर्माण केली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ.हमीद दाभोळकर यांनी आज येथे केले.अहमदनगर औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय संस्थेच्या स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “स्नेहवात्सल्य प्री – स्कूल ” प्रकल्पाचे उद्घाटन आज डॉ.दाभोळकर यांच्या हस्ते झाले.यावेळी इंग्लंड येथील संगणक तज्ञ सागर खंडेलवाल,या शाळेसाठी सर्व संसाधने देणाऱ्या सौ.मनीषा संतोष पाटील आदी उपस्थित होते.स्नेहालय संस्थेने स्नेहालय संकुलातील कर्मचारी महिलांची बालके तसेच अहमदनगर औद्योगिक वसाहती मधील औद्योगिक कामगारांच्या 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्नेह वात्सल्य प्री स्कूल ची स्थापना केली. सध्या 2 वर्षांवरील मुलांना येथे प्रवेश दिला जातो. परंतु लवकरच लहान बाळांसाठीची सुविधाही येथे निर्माण केली जात आहे.गेली अनेक वर्ष सामाजिक संस्था आणि वंचितांच्या हक्क रक्षणासाठी निःशुल्क सेवा देणारे वकील राजेंद्र खंडेलवाल यांचा नागरी गौरव करण्यात आला.ॲड.खंडेलवाल म्हणाले की वकिली हा फक्त व्यवसाय नाही. वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले ज्ञान आणि कौशल्य वापरणे हा वकिली धर्म आहे.अन्यायग्रस्तांना न्याय मिळाल्यावर त्यांचे बदललेल्या आयुष्य आणि आनंद पाहणे हीच आयुष्याची समृद्धी आपण मानतो,असे ते म्हणाले.पुणे येथील सपलिंग प्री स्कूलच्या मनीषा पाटील यांनी त्यांच्या शाळेची सर्व संसाधने या सप्रेम भेट दिली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन वर्षा पितांबरे यांनी केले. प्रस्तावना हनीफ शेख तर संजय बंदिष्टी यांनी आभार मानले.सर्वश्री राजेंद्र शुक्रे,मुख्याध्यापिका क्षितिजा हडप, उपमुख्याध्यापिका भक्ती शुक्रे,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.