अहमदनगर (दि.१२ ऑगस्ट):-जिल्ह्यात मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत असुन घरोघरी बीएलओ जाऊन मतदारांची नोंदणी करत आहेत.नागरिकांनी बीएलओंना मदत करुन आपली नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

नव मतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील 107 महाविद्यालयामध्ये युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रत्येक महाविद्यालय स्तरावर बीएलओ,महसूल दूत व महाविद्यालयाचे नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातुन नव मतदारांची शंभर टक्के नाव नोंदणी करून घेण्यात येणार आहे.गृहनिर्माण संस्थामध्ये वास्तव्यास असणा-या नागरिकांची व भटक्या विमुक्त जमातीतील तांडा,वस्त्या येथील नागरिकांची मतदार नाव नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन 12 ते 13 ऑगस्ट,2023 दरम्यान करण्यात आलेले आहे.जिल्ह्यातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन मतदारांची बीएलओ मार्फत पडताळणी करण्यात येत आहे.ही मोहिम 21 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे.यामध्ये 1 ऑक्टोबर, 2023 ते 1 जानेवारी,2024 या दिवसात 18 वर्ष पूर्ण करणा-या भावी मतदारांची यादी तयार करणे,नाव नोंदणी न केलेल्या पात्र मतदारांचा नमुना 6 भरून घेणे,मयत,दुबार व स्थलांतरीत मतदारांचे नमुना 7 भरून घेणे,मतदारांच्या मतदार यादीतील तपशिलात काही दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना 8 भरून घेणे आदी कामे करण्यात येत आहेत.नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करुन अधिकाधिक मतदार नोंदणी करावी, असेही कळविण्यात आले आहे.
