अहमदनगर (दि.१३ ऑगस्ट):-कोतवाली पोलिसांनी चोरीला गेलेले व हरवलेले एक लाख ६२ हजार रुपये किमतीचे सात महागडे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत विशेष मोहीम राबवून सहा लाख रुपये किंमतीचे ३९ मोबाईल तपास करून हस्तगत केले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले आहेत.मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मोबाईल शोधण्याचे आदेश कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला दिले होते.कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून गेल्या तीन महिन्यात चोरीतील सहा लाख रुपये किमतीचे ३१ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार,कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. चोरीतील विवो,रेडमी,ओप्पो, सॅमसंग या कंपनीचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोना/सलीम शेख,राजेंद्र फसले,अभय कदम तसेच दक्षिण मोबाईल सेलचे शिंदे यांनी ही कारवाई पार पाडली.
मोबाईल यांना मिळाले परत
शेख इरफान इब्राहिम (रा. तांबटकर गल्ली अहमदनगर) यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, एजाज शेख (रा.मुकुंदनगर) यांचा विवो कंपनीचा,दीपक दळवी (रा.केडगाव,अहमदनगर) यांचा वन प्लस कंपनीचा, किशोर पटेल (रा.टिळक रोड) यांचा सॅमसंग कंपनीचा, युसुफ शेख (रा.भिवंडी,मुंबई) यांचा रेडमी, राजू वाघ (रा.अहमदनगर) यांचा रियल मी कंपनीचा, शेख रहीम (रा.अहमदनगर) यांचा रियल मी कंपनीचा असे मोबाईल परत केले.
तक्रारदार यांनी मानले आभार
गेलेला मोबाईल परत मिळेल,ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता.मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
