संगमनेर/राजेंद्र मेढे (दि.१४ ऑगस्ट):-राज्यात पानमसाला,सुगंधी तंबाखू प्रतिबंधित असताना संगमनेर तालुक्यात चंदनापुरी येथे मोठा साठा आढळून आला आहे.तालुक्याच्या चंदनापुरी गावात महाराष्ट्रात प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा असल्याची माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांच्या निर्देशाने पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७५ हजार रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करत एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (दि. १२) ही कारवाई करण्यात आली.दीपक रामनाथ कढणे (वय ३८, रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, त्याच्याविरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष विठ्ठल फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंदनापुरी गावातील एका घराच्या पाठीमागे भिंतीचे आडोशाला कोपऱ्यात कुणालाही दिसून येणार नाही, अशा पद्धतीने गुटख्याचा साठा असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे यांना समजली. त्यांनी कढणे पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले असता पोलिस हेड कॉन्स्टेबल फड,अमित महाजन,पोलिस नाईक शांताराम मालुंजकर,सचिन उगले,चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल आठरे हे शनिवारी (दि. १२) सकाळी १०.३० च्या सुमारास चंदनापुरी येथे कारवाईसाठी पोहोचले.त्यावेळी तेथे दीपक कढणे हा उभा होता,त्याच्या घराची पोलिस झडती घेत असताना घराचे भिंतीचे आडोशाला प्लॅस्टिकच्या कागदाचे खाली झाकलेल्या पांढऱ्या,हिरव्या रंगाच्या पाच-पाच लहानमोठ्या गोण्या आढळून आल्या.पोलिसांनी त्या उघडून पाहिल्या असता त्यात प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखू आढळून आली.मुद्देमाल आणि याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
