अहमदनगर(दि.२० ऑगस्ट):-शहरातील विविध ठिकाणावरून सायकली चोरी करणाऱ्या अट्टल चोराला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे.चोरीला गेलेल्या ५५ हजार रुपये किमतीच्या ११ सायकली कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या असून,दिनेश शेषराव व्यवहारे (वय ५० वर्षे,रा.दातरंगेमळा, अहमदनगर) या आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. कोतवाली पोलिसांनी हस्तगत केलेल्या सायकली ज्या नागरिकांच्या असतील त्यांनी ओळख पटवून पोलीस ठाण्यातून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.टेलर काम करणाऱ्या अजय काजी मोरे (वय ५४ वर्षे,रा.बागडे मळा, बालीकाश्रमरोड,अहमदनगर) यांची सायकल सांगळे गल्ली येथून दि.१२ ऑगस्ट रोजी चोरीला गेली होती.कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की शहरातील विविध ठिकाणावरून दिनेश व्यवहारे याने सायकली चोरी केल्या असून,तो सायकल विक्री करण्या करिता गाडगीळ पटांगणात येणार आहे.या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी गाडगीळ पटांगण परिसरात सापळा लावला होता.आरोपी दिनेश व्यवहारे चोरीची सायकल विक्री करण्यासाठी आला असता त्याला कोतवाली पोलिसांनी पकडले.आरोपीची कसून चौकशी केली असता शहरातील विविध ठिकाणांवरून ११ सायकली चोरल्याची कबुली त्याने दिली.गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/मुकुंद दुधाळ करत आहेत.पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार तनवीर शेख,गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे,सलीम शेख,रियाज इनामदार,अभय कदम,संदिप थोरात,अमोल गाढे,कैलास शिरसाठ,सागर मिसाळ,सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे,अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सायकल घेऊन जाण्याचे आवाहन
शहरातून समर्थ शाळा सांगळे गल्ली,गाडगीळ पटांगण, प्राची कोचिंग क्लासेस दातरंगे मळा,बागराज हडको नालेगाव व परिसरातून सायकल चोरी केल्या असल्याचे आरोपीने ठिकाणे दाखविली आहेत.काही सायकलवरील नाव आणि रंग बदलण्याचे आढळून आले आहे.ज्या नागरिकांच्या सायकली चोरीला गेल्या त्यांनी कोतवाली पोलिसांसोबत संपर्क करून आणि सायकलीची ओळख पटवून सायकल घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.पोलीस नाईक कैलास शिरसाठ (९८२२८७८३६४) मुकुंद दुधाळ (९५२७३५०७१५) आणि सागर मिसाळ (८३२९६१४४४१) यांच्याशी संपर्क करून सायकली घेऊन जाण्याचे सांगण्यात आले आहे.
