शाळा महाविद्यालय परिसरात वाद केल्यास आणि विद्यार्थिनींची छेड काढल्यास सोडणार नाही रॅगिंग केल्यावर ही होणार कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा इशारा
अहमदनगर (दि.२५ ऑगस्ट):-छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोतवाली पोलिसांनी हद्दीतील शाळा कॉलेजच्या परिसरात गस्त वाढवली आहे. तरीसुद्धा विद्यार्थिनींची कोणी छेड काढत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. अहमदनगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना विनाकारण त्रास देणाऱ्या टवाळखोरांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक यादव यांनी केले.
मुलींसोबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा तसेच मुलींमध्ये कायद्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने नगर कॉलेज येथे कोतवाली पोलीस स्टेशन आणि नगर कॉलेज यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी २००० विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. महाविद्यालयीन जीवनात असताना रॅगींग म्हणजे काय ?, विनयभंग म्हणजे काय ?, कोणी त्रास दिल्यास काय केले पाहिजे? या प्रश्नांवर पोलीस निरीक्षक यादव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच लैंगिक प्रतिबंधक कायदा, त्यातील मुलींच्या संरक्षणासाठीच्या तरतुदी, महाविद्यालय प्रशासनाने काय खबरदारी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. शाळा-कॉलेजमध्ये असताना कोणी त्रास दिल्यास त्या विद्यार्थिनीने तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे. कारण जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत पोलीस काही करू शकत नाहीत, तसेच तक्रार करणाऱ्याचे नाव पोलिसांकडून गोपनीय ठेवले जाईल. मुलींनी तक्रारी दिल्यानंतर त्रास देणाऱ्या कितीतरी टवाळखोरांना धडा शिकविल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक यादव यांनी कामकाजाच्या दरम्यान आलेले मुलींच्या छेडछाडीचे तसेच कोणत्या प्रलोभनाला बळी पडल्यानंतर मुलींच्या आलेल्या तक्रारी याबाबत अनुभव विद्यार्थ्यांसमोर ठेवले आणि विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले. प्राचार्य डॉ आर. जे. बार्नबस, प्रा. डॉ.सय्यद रज्जाक ,उपप्रचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, प्रा. विनीत गायकवाड, प्रा.कुटीनो फ्रॅक्लींन, प्रा. डॉ. नोयल पारगे, दिपक अल्हाट पोलीस जवान योगेश खामकर, देवेंद्र पंधरकर आदींसह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. भागवत परकाळ यांनी केले. आभार प्रा. डॉ विलास नाबदे यांनी मानले.
रॅगिंगला विरोध करा आणि तक्रार द्या
मुला-मुलींना महाविद्यालयात व वसतिगृहात रॅगिंग घेणाऱ्यांमुळे मानसिक व शारीरिक त्रास होतो. रॅगिंग घेणाऱ्यांची तक्रार न केल्यामुळे या प्रकाराला तोंड द्यावे लागते. लवकर भावनिक होणाऱ्या विद्यार्थ्यांना रॅगिंगमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. रॅगिंग घेणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे रॅगिंग घेणाऱ्यांना न घाबरता त्यांची प्रथमता महाविद्यालयीन प्रशासनाकडे तक्रार करा व वेळप्रसंगी पोलिसांकडे तक्रार द्या, असे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
महाविद्यालयात नसणाऱ्यांसोबत संपर्क ठेवू नका
काही कारणावरून महाविद्यालयात झालेल्या वादात बाहेरील मुले असतात, त्यांच्यामुळेच वाद वाढतात, अशी प्रकरणे समोर आली आहेत. महाविद्यालयात एखादा वाद झाल्यास बाहेरील व्यक्तीला बोलविण्याचे काही कारण नाही, काहीही वाद असो आधी महाविद्यालयातील शिक्षकांना किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी यावेळी केले.