Maharashtra247

श्री.क्षेत्र मोहटादेवी गडावर खासदार सुजय विखे पाटील यांच्यामार्फत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी..२०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ दे देवीला घातले साकडे..

पाथर्डी (प्रतिनिधी):-सध्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण असून विविध देवी मातांच्या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.

याच अनुषंगाने खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिकाताई राजळे यांनी अनोखी संकल्पना राबवून अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर मंदिराच्या कळसावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली आहे.दरम्यान महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री.भगवती मोहटादेवीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिकाताई राजळे यांनी मनोभावे दर्शन घेतले.

तसेच देवी मातेची मनोभावे पूजा करून आरती देखील केली व उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप केले. यंदाच्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मोहटादेवी मंदिर परिसरात काहीतरी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचे मनात होते. आज त्या संकल्पनेची पूर्ती झाली आहे. याआधी देखील कधीही न राबविण्यात आलेले अनेकविध उपक्रम राबविण्यासाठी मी नेहमी प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे मोहटादेवीचे आमच्या मनात एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासमवेत मंदिराच्या कळसावर पुष्पवृष्टी करून देवीची आराधना करण्याचं काम केलं असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

यासोबतच प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. सुजय विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याविषयी आणि आगामी काळात संपन्न होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत देखील भाष्य केले. तसेच संपूर्ण जिराईत भागातील शेतकरी हा सुखावला गेला पाहिजे, पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटांपासून समाजाला दूर ठेवणे आणि २६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होऊ घातलेला दौरा निर्विघ्नपणे पार पडावा आणि आमचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत असं साकडं देवीला घातलं आहे, असे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं.

या प्रसंगी अभयकाका आव्हाड,अजय रक्ताटे,बंडूशेठ बोरूडे,प्रतीक खेडकर,संजय बडे,धनंजय बडे,अविनाश पंदे संदीप पालवे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page