Maharashtra247

संगमनेर शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक मार्गावर वाळूने भरलेल्या डंपरने एकास दिली धडक ड्रायव्हर मात्र डंपर घेऊन झाला फरार

संगमनेर (राजेंद्र मेढे):-संगमनेरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक मार्गावर एका वाळूने भरलेल्या डंपरने अपघात करून पळ काढल्याची घटना गुरुवारी (दि.२) दुपारी घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला वाटसरूने पाहिले मात्र,वाळू घेऊन जाणारा डंपर चालकाने मोठ्या शिताफीने त्याठिकाणाहून पळ काढला. पळून गेलेल्या चालकाने जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीची साधी विचारपूस ही केली नसल्याने नागरिक चांगलेच संतापले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगरगावचे एक शेतकरी संगमनेर शहरातील आपले काम उरकून घुलेवाडीच्या दिशेने जात असताना १३२ केव्ही समोर असलेल्या चौकात दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान एक छोटा डंपर वाळू घेऊन येत होता. अचानक त्या डंपरने अकोले बायपासला वळण घेतले आणि पुढे आल्यानंतर रस्त्यातच ब्रेक लावला असता डोंगरगावच्या शेतकऱ्याला धक्का लागला आणि क्षणात ते रस्त्यावर कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून बघ्यांची गर्दी झाली. तेथून काही जणांनी त्यांना कुटे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, तो मुजोर डंपर चालक त्याठिकाणी थांबला देखील नाही. दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर बाजूला थांबलेल्या डंपर चालकाला स्थानिकांनी गाडीत काय आहे, असे विचारले असता त्याने वाळू आहे, असे सांगितल्याने स्थानिकांचा पारा चढला आणि प्रशासनावर ताशेरे ओढले.

त्यानंतर घाबरलेला डंपर चालक तेथून पळून गेला असता काही लोकांनी त्याचा पाठलाग केला. परंतु अपघात करून पळालेला तो डंपर चालक आणि मालक किती मुजोर असतात हे यातून दिसून आले.शहर पोलिसांनी तालुक्यातून शहरात येणाऱ्या विना परवाना वाळूच्या अवजड गाड्या रोखल्या पाहिजेत की ज्यामुळे अपघात होणार नाही.

You cannot copy content of this page