उडान प्रकल्प बालविवाह मुक्त भारताची प्रेरणा निर्माण करणार-सौ.सायली पालखेडकर
अहमदनगर (दि.१५ नोव्हेंबर):-स्नेहालय संचलित उडान प्रकल्प,मराठी पत्रकार परिषद,जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व चाईल्ड हेल्प लाईन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि.14 नोव्हेंबर) बालदिनाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात आले होते.
त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे लोकार्पण व बालविवाह मुक्ती मिशनचे उद्घाटन राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर व मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष माधवराव देशमुख, बाल कल्याण समितीच्या सदस्या ॲड.अनुराधा येवले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, महाराष्ट्र राज्याचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.सूचित ताबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बालकांनी हवेत फुगे सोडून केले यावेळी सर्व मान्यवरांनी गुलाबाचे पुष्प देऊन बालकांचे सत्कार करून बालकांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.बाल दिनानिमित्त जादूगार विनोद कराचीवाला आणि ID मास्टर गायत्री कराचीवाला यांनी जादूचे प्रयोग दाखवून बालकांचा बाल दिनाचा आनंद द्विगुणित केला.अध्यक्षीय भाषणातून पालखेडकर म्हणाल्या की, उडान या प्रकल्पामुळे अहमदनगर जिल्हा नवे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य बालविवाह मुक्त राज्य बनवू, बाल हक्क आयोग बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम,लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, बालकामगार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, अश्या बालकांसाठीच्या कायद्यांची अंमलबजावणी व जनजागृती करिता महाराष्ट्र राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांना सोबत घेऊन नियोजनबद्ध कार्य करत आहे. मागील तीन वर्षांपासून उडान प्रकल्पाचे कार्य जवळून अनुभवता आले. स्नेहालयचे सेवाभावी कार्यकर्ते अर्ध्या रात्री बालविवाह पीडित बलिकेची सुटका करण्यासाठी सातत्यपूर्ण धडपड व आमच्याही संपर्कात राहून मार्गदर्शन घेऊन या अत्याचारित बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
यासाठी आम्ही सुद्धा रात्री अपरात्री त्यांचे आलेले अनेक फोन ना त्वरित प्रतिसाद देऊन या बालस्नेही कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करत असतो.यामुळे अनेक प्रकरणात एकत्रित काम केल्यामुळे उडान प्रकल्पाच्या कार्याची ओळख आज संपूर्ण महाराष्ट्र राज्याला झालेली आहे.
बालविवाह सारख्या अतिसंवेदनशील विषयांवर संपूर्ण 24 तास चालणाऱ्या प्रकल्पाची स्थापना करून स्नेहालय संस्थेने एखाद्या गंभीर प्रश्नांवर उत्तर शोधले असल्याने अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर उडान प्रकल्प बालविवाह मुक्त भारताची प्रेरणा निर्माण करणार आहे. कार्यक्रमाची व प्रकल्पाची प्रास्ताविक उडान प्रकल्पाचे मानद संचालक ॲड.बागेश्री जरंडीकर यांनी करतांना सगितले की, स्नेहालय संस्था ही मागील 34 वर्षापासून वंचित दुर्लक्षित उपेक्षित घटकातील महिला व बालकांसाठी अहोरात्र नियोजनबद्ध काम करत आहे.
जिल्ह्यातील व समाजातील अडचणीत सापडलेल्या बालके व महिलांचे स्नेहालय संस्थेने संपूर्ण पुनर्वसन करून त्यांचे आयुष्य सुखकार केले आहे.त्याचाच एक भाग म्हणजे कोरोनापासून उद्भवलेली समस्या,बालविवाह या समस्येला मुळापासून नष्ट करण्यासाठी स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, सचिव राजीव गुजर,संचालक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहालयाने जिल्हा प्रशासनासोबत उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान जिल्ह्यात राबवून मागील 4 वर्षात 300 पेक्षा जास्त बालविवाह रोखण्यात यश मिळविले आहे. अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याकरिता स्नेहालय संस्थेच्या अंतर्गत उडान या स्वतंत्र प्रकल्पाची नव्याने संरचना करण्यात आली आहे. हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यासाठी बालविवाहास बळी पडणाऱ्या बालकांना शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि पुनर्वसन करण्यासाठी काम करेल. त्यातून अनेक बालकांचे जीवन सावरले जाणार आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याची सक्रिय अंमलबजावणी आणि बालविवाह विषयक जनजागृती करण्यासाठी या प्रकल्पांतर्गत काम केले जाणार असल्याचे स्नेहालय परिवाराच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बालकांसाठी असलेले कायदे, त्यांचे हक्क आणि बालविवाह पिडीत मुली आणि संपूर्ण समाज यावर त्याचा होणारा दुष्परिणाम या बाबत जागरूकता निर्माण करून अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचें ध्येय उडान प्रकल्पाचे आहे.
*उडान प्रकल्पाची उद्दिष्टे:-* 1.अहमदनगर जिल्ह्यातील बालविवाहाची कारणे ओळखणे आणि कृतीद्वारे त्यावर मात करणे
2. बालविवाह पिडीत मुलींना शिक्षण,आरोग्य सुविधा,रोजगाराचे पर्याय,कौशल्य प्रशिक्षण आणि कायदेशीर मदत, सेवा पुरविणे
3.काळजी आणि संरक्षण गरज असणाऱ्या बालक बालिकेला पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध करून देणे,
4.कुटुंबांमध्ये आणि समाजामध्ये बालविवाहामुळे होणारे दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे,
5.बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती करणे,बालविवाह रोखण्याबाबत जिल्हा स्तरापासून ते ग्रामीणस्तर ते जिल्हा स्तरापर्यंत बाल संरक्षण समिती,बालविवाह प्रतिबंधक अधिकारी(ग्रामसेवक),बाल विकास प्रकल्प अधिकारी,अंगणवाडी सेविका, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग इत्यादी यांसारख्या विविध सरकारी विभाग व कर्मचारी यांना त्यांच्या भूमिकांबद्दल जनजागृत कार्यक्रम घेणे. विवाह संस्था, धर्म आणि जात पंचायत प्रमुख, सर्व धर्माचे पुजारी विवाहासाठी सर्वतोपरी सेवा पुरवणारे सर्व अश्या घटकांना बालविवाह विषयक कायदा आणि त्याचे परिणाम याबद्दल माहिती देऊन त्यांचे प्रबोधनकरणे,बालविवाह विषयावर जनजागृतीसाठी विविध सोशल मीडिया चा वापर करणे,जनजागृती कार्यशाळा आयोजित करून पत्रकार, लेखक, इत्यादी मीडिया भागधारकांचे प्रबोधन करणे,बालविवाह पिडीतांसाठी तसेच किंवा ज्यांना त्यासंबंधी माहिती द्यायची आहे अश्यांसाठी 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून देणे. हे असणारं आहे.
यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी बालकांना दिवाळी, पाडवा, भाऊबीज व बालदिनाच्या शुभेच्छा देऊन उडान प्रकल्पासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन यापुढे सर्वांनी एकत्र येऊन अहमदनगर जिल्हा बाल विवाह मुक्त जिल्हा करू असे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका बोबडे यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे व बालगोपाळांचे आभार उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश सूर्यवंशी उषा खोल्लम, क्षितिजा हडप, दिपाली बोरुडे, अलीम पठाण, शाहिद शेख, अब्दुल खान, कल्पना देशमुख, सीमा कांबळे, राहुल कांबळे, राहुल वैराळ यांनी परिश्रम घेतले.