
अहमदनगर (दि.१६ नोव्हेंबर):-भारतीय महिला ही अबला नसून ती जागतिक क्रीडा क्षेत्रातही आपल्या देशाची, राज्याची, जिल्ह्याची प्रतिमा उंचावत असते हेच अनेक भारतीय महिला खेळाडूंनी सिद्ध केले आहे.

जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावून महिला पोलिस हवालदार अर्चना काळे यांनी महिलांनी क्रीडा क्षेत्रात आपल्या नगरचा नावलौकिक उंचावला आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
मंगोलिया या देशात नुकतीच जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या महिला पोलिस हवालदार अर्चना काळे यांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. मंगोलिया देशात झालेल्या या स्पर्धेत ३७ देशांचे ५०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे म्हणाले, भारतीय स्त्री म्हणजे चूल व मूल यात अडकलेली महिला आहे असाच सर्वसाधारण समज आहे. मात्र अर्चना काळे यांनी जागतिक स्पर्धेत रुपेरी कामगिरी करुन शहराचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे. जिल्ह्यातील महिला खेळाडूंसाठी काळे यांची कामगिरी प्रेरणादायी ठरेल.