अहमदनगर (दि.१ जानेवारी):-तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अत्याचार व अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पोपट सरोदे यांनी तसे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात दिले आहे.यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरोदे म्हणाले,आपण सोशल मिडियावर पीडित युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्याची फिर्याद वाचली. युवती आपल्याच समाजाची असल्याने आपण संपर्क केला असता तिची सर्व कहाणी समजली.तिच्यावर अत्याचार करणारे अद्यापही मोकाट असल्याचे समजले.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले.
मुख्य आरोपीने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.नंतर तिला समजले की आरोपीवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असून त्याला राजकीय वरदहस्त आहे. त्याच्या बळावर त्याने यापूर्वी केलेले गुन्हे दडपले आहेत. तसेच त्याच्याशी शरीरसंबंध आल्यामुळे ती गर्भवती राहिली होती,मात्र त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा गर्भपात केला.आता प्रकरण अंगलट येत असल्यामुळे आरोपींनी तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करुन वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला आहे.
सरोदे पुढे म्हणाले,आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयात लेखी निवेदन दिलेले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करुन पीडितेला न्याय मिळवून द्यावा.अन्यथा २६ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.