Maharashtra247

तू या ठिकाणचे प्रवासी कसे काय भरले? प्रवासी वाहकाकडून दमदाटी करून पैसे उकळणे पडले दोघांना महागात;खंडणीचा गुन्हा दाखल कोतवाली पोलिसांची कारवाई 

अहमदनगर (दि.२ जानेवारी):-‘तू या ठिकाणचे प्रवासी कसे काय भरले?आणि इथून पुढे भरायचे असतील तर प्रत्येक सिटाप्रमाणे आम्हाला ५० रु. द्यावेच लागतील’ असे अडवणूक करून व धमकावून पैशांची मागणी करणाऱ्या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरशाद सय्यद (रा.मुकुंदनगर अहमदनगर ) व शिफान दारुवाला (रा.आलमगीर अहमदनगर ) अशी खंडणी मागणाऱ्या आरोपीची नावे आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे,’कृष्णा पळसकर (रा.पळशी) हे संभाजीनगर-नगर अशी प्रवासी वाहतूक करून कुटुंबाची उपजीविका भागवतात.दि.३१ रोजी माळीवाडा येथून प्रवासी वाहतूक करत असताना रात्री ८.३० वा. तीन प्रवाशांनी औरंगाबादला जायचे आहे म्हणून हात करून गाडी थांबवली.

प्रवास भाडे ठरल्यानंतर प्रवासी घेऊन निघत असताना तिथे अचानक लगेच दोघे आले व ‘तू इथे प्रवासी कसे काय भरले? तुला प्रती सीट ५० रु. द्यावे लागतील.यापुढेही गाडी चालवायची असेल तर पैसे द्यावेच लागतील?’ असे म्हणत दमदाटी करत गाडी अडवून ठेवली.फिर्यादीने लगेच गाडीतून उतरून जवळच इम्पिरिअल चौकात पोलिसांची नाकाबंदी असलेल्या ठिकाणी जाऊन मदत मागितली.

त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यापूर्वी अशा प्रकारच्या तक्रारी तोंडी स्वरूपात कोतवाली पोलिसांना मिळाल्या होत्या, यावेळी मात्र वेळ साधून कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

ही कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे, अमोल गाडे,देवा थोरात, सतीश भांड आदींनी केली आहे.

तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन

बेकायदेशीरपणे कोणीही कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी करत असल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रकार आढळून आल्यास कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page