डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर पडेल-क्रीडामंत्री संजय बनसोडे;भीमगीतांवर मंत्री संजय बनसोडे,आ.संग्राम जगताप,महापालिका आयुक्त पंकज जावळे यांच्यासह भीमसैनिकांनी केला जल्लोष
अहमदनगर (दि.21 जानेवारी):-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे अहमदनगर शहराच्या वैभवात भर पडेल,असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण,बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठीच्या चौथऱ्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील,आमदार संग्राम जगताप,महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले की,अनेक संघर्षातून तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी होत आहे.अहमदनगर शहर वासीयांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या वैभवात भर पडेल अशा भव्यदिव्य उभारणी करण्यात यावी. इंदूमिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीला वेग देण्यात येत असून डिसेंबर २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्णत्वास नेण्याबरोबरच भीमा कोरेगाव येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.अहमदनगर शहरात भव्यदिव्य बुद्धविहार उभारणीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही मंत्री संजय श्री बनसोडे यांनी यावेळी दिली.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की,शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गती मिळून काम वेळेत पूर्ण होईल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून पुतळ्याच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की,अनेकांच्या संघर्षातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीमुळे शहरवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज या निमित्ताने पूर्ण होत आहे. पुतळ्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पिढच्या पिढीपर्यंत अखंडितपणे पोहोचणार आहेत.पुतळ्याचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. शहरात अनेक छोट्या बुद्धविहाराची उभारणी करण्यात आली असून एक भव्यदिव्य बुद्धविहार उभारणीची मागणी त्यांनी क्रीडामंत्र्यांकडे यावेळी केली.यावेळी औरंगाबाद येथील गायक अजय देहाडे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी भीम गीतांवर राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे,आमदार संग्राम जगताप, महापालिका प्रशासक तथा आयुक्त पंकज जावळे यांच्यासोबत भीमसैनिकांनी एकच जल्लोष केला.या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे पदाधिकारी,महिला तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.