Maharashtra247

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

दिल्ली:-खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे.

कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी,कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खा.विखे पाटील यांनी करून दिली असून शाह यांनीही याबाबत लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,सध्या कांद्याचे भाव गडगडले असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि त्यांना कांदा पिकविण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा जर विचार केला तर सध्या कांद्याला बाजारपेठेत मिळणारा भाव हा कमी आहे.नगर,नाशिक,पुणे या कांदा पट्यात कांदा पीक घेणारा शेतकरी वर्ग मोठा असून निर्यात बंदीचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची वस्तुस्थिती खा.विखेंनी शाह यांच्या समोर मांडली आणि हा मुद्दा गृहमंत्री अमित शाह यांच्या लक्षात आणून दिला.

निर्यातबंदीचा परिणाम म्हणून कांदा खरेदी केंद्रावर येणाऱ्या कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही.कांद्याला एकरी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर शेतकरी वर्गातून केंद्र सरकार कडून मार्ग निघण्याची आशा आहे. कांद्याच्या प्रती क्विंटल मागे असलेले दर हे वाढले पाहिजे. या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि या दृष्टिकोनातून निर्यातबंदी उठवणे किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना खा.विखे पाटील यांनी शाह यांची भेट घेऊन केली आहे.

यावेळी खा.सुजय विखेंना आश्वस्त करताना अमित शाह यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असून अनेक शेतकरी हिताच्या योजना हाती घेतलेल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

You cannot copy content of this page