कांदा व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये चोरट्यांनी केले लंपास
राहुरी प्रतिनिधी (दि.३०डिसेंबर):-राहुरी शहरातील अहमदनगर-मनमाड मार्गावरील पाण्याची टाकी परिसरात कांद्याच्या व्यापार्याच्या चारचाकीतून सुमारे ६ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल २९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.राहुरी येथील कांद्याचे व्यापारी संतोष बाफना हे शेतकर्यांना कांद्याची रक्कम देण्यासाठी बँकेतून ६ लाख रूपये काढून आपल्या चारचाकी वाहनातून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन इसमानी त्यांच्या चारचाकीचा वेग कमी झाल्यावर टायरखाली टोकदार वस्तू टाकून त्यांची चारचाकी पंचर केली.त्यानंतर बाफना यांना तुमची गाडी पंचर झाली आहे,असे सांगीतल्याने बाफना यांची गाडी पंचर झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आपली चारचाकी गाडी जवळच असलेल्या एका पंचरच्या दुकानाजवळ नेली असता त्या भामट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करून काही क्षणात त्यांच्या गाडीतून ६ लाख रूपये रोकड असलेली पिशवी घेऊन धुमस्टाईलने पोबारा केला.