वकील बांधवांना संरक्षण मिळालेच पाहिजे… ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट झालाच पाहिजे…विविध मागण्यांसाठी उद्या ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यालयावर वकिलांचा महामोर्चा
अहमदनगर (दि.८ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ॲड.राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड.मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्यांचे २५ जानेवारी २०२४ रोजी अपहरण करुन त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती.
या गुन्ह्याचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ तर राहुरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी १ अशा एकूण पाच आरोपींना अटक केले आहे.या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वकिलांनी संप पुकारला होता.
त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बार असोसिएशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की राज्यातील तमाम वकील बांधवांचे न्याय हक्कासाठी व स्व.ॲड.आढाव दांपत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, वकील बांधवांना संरक्षण मिळालेच पाहिजे ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट झालाच पाहिजे या व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी मोर्चाचे आयोजन केले आहे.यावेळी बार असोसिएशनच्या वतीने सर्व वकील बांधवांना सकाळी ११.०० वाजता जिल्हा न्यायालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.