नोदंणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा-महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर (दि.८ प्रतिनिधी):-नोदंणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू असलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कालावधीला नागरिकांच्या मागणीनुसार मुदतवाढ दिली आहे.यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी अखेरपर्यंत ३४ हजार ४२७ नागरिकांनी योजनेचा फायदा घेतला.यात निष्पादित दस्तावरील १ लाखापर्यंत मुद्रांक शुल्क अथवा दंड असलेल्या १० हजार २५ प्रकरणांमध्ये शासनाने १०० % शुल्क माफी दिली आहे. त्यानुसार शासनाने १२ कोटी २७ लाख ५९ हजार ६८५५ रुपयांचे शुल्क माफ करून नागरिकांना मोठा दिलासा दिला,
तर शासनाला ८१ कोटी ७८ लाख ६३ हजार ६३९ रुपयांचा महसूल मिळाल्याचे महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.राज्यातील सन १९८० पासून २००० पर्यंत रखडेल्या मुद्रांक शुल्काच्या वसूलीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून दोन टप्प्यात अभय योजना राबविण्यात येत आहे.या योजनेत सन २००० पुर्वीच्या प्रकरणात दंडात १०० टक्के सवलत आणि मुद्रांकांत सवलत दिली जात आहे. एक लाखाच्या आतील मुद्रांक फरक असल्यास आणि ही प्रकरणे सन १९८० ते २००० या कालावधीतील असल्यास मुद्रांक शुल्कात ८० टक्के आणि त्यावरील दंडात १०० टक्के सवलत दिली आहे. एक लाखापेक्षा जास्त मुद्रांक असल्यास ५० टक्के रक्कम आणि दंड पूर्ण माफ करण्यास मुभा दिली आहे. सन २००० नंतरच्या प्रकरणांत २५ लाखांपेक्षा जास्त मुद्रांक असल्यास दंड ९० टक्के माफ होणार आहे,तर २५ लाखांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क असल्यास त्यामध्ये २५ टक्के माफी आणि दंड पूर्ण माफ केला जाणार आहे.
जिल्हा मुद्रांक कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत ही योजना राबवली जात आहे.या योजनाचा पहिला टप्पा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आला होता. पण नागरिकांच्या मागणीमुळे महसूल मंत्री विखे पाटील यांनी या टप्प्यातील कालावधी वाढविण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार शासनाने पहिल्या टप्प्याचा कालावधी वाढवून २९ फेब्रुवारी पर्यंत केला आहे. या योजनेचा दुसरा टप्पा १ मार्च ते ३१ मार्च पर्यंत राबविला जाणार आहे. सदरची योजना ही ठराविक काळासाठी असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांनी केले आहे.
विभाग निहाय प्रकरणांची माहिती
मुंबई विभाग – १८,४८०,ठाणे विभाग – ६८,१०,पुणे विभाग – ४२७६, नाशिक विभाग- १५५३,नागपूर विभाग – १२०७,छ.संभाजी नगर – १०५२,अमरावती विभाग- ५०१, लातूर विभाग – ४६८