अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ जानेवारी):-बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते.त्यांनी ‘दर्पण’ नावाने अँग्लो-मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले.तो ६ जानेवारी १८३२ रोजी प्रथम प्रकाशित झाला म्हणून ६ जानेवारी हा पत्रकार दिन ( पत्रकारिता दिन)म्हणून साजरा केला जातो. आधुनिक युगातील मीडिया म्हणजे प्रिंट वर्तमानपत्रे, मासिके पत्रिके,टीव्ही वृत्तवाहिन्या,रेडिओ,सोशल मीडिया,इंटरनेट इ. प्रेस म्हणजे मीडिया नेहमीच लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो.लोकशाहीचे तीन मुख्य स्तंभ आहेत.कार्यपालिका,विधिमंडळ आणि न्यायपालिका पत्रकारिता हा चौथा आधारस्तंभ मानला जातो.देशासह महाराष्ट्रात वृत्तपत्रांचा मोठा इतिहास आहे.सर्व क्षेत्रात न्याय देण्याचे काम वृत्तपत्रे नेहमी करत असतात. ६ जानेवारी रोजी राज्यात पत्रकारदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पत्रकारदिनी वृत्तपत्रांना सुट्टी नसते.माध्यमांतील सर्व संपादक,पत्रकार,कर्मचारी या दिवशी आपल्या कार्यालयातील कामकाज सांभाळून पत्रकारदिन साजरा करतात.लोकशाहीचा पत्रकारिता हा चौथा आधारस्तंभ मानला जात असल्याने राज्यात ६ जानेवारी ( पत्रकारदिन) शासकीय सुट्टी जाहीर करावी.तसेच,पत्रकारदिनी राज्यातील सर्व वृत्तपत्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत. परिणामी,वृत्तपत्रातील सर्व पत्रकार,कर्मचारी बांधव हे पत्रकारदिन मोठ्या उत्साहात साजरे करू शकतील.तसेच,राज्यातील प्रत्येक शाळा,महाविद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था,शासकीय कार्यालयात पत्रकारदिन साजरा करण्याबाबत आदेश काढावेत या मागणीचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मा. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार,पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,आ.छगन भुजबळ,आ.बावनकुळे,ना.चंद्रकांत पाटील,आ.नाना पटोले,यांना दिले आहे.
