अहमदनगर (दि.३० मार्च):-अहमदनगर शहरातील उड्डाणपूलाखाली कोठी परिसरातील नाल्यात बंदुकीच्या अनेक गोळ्या सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या गोळ्या नगर शहरातील अहमदनगर पुणे संभाजीनगर महामार्गावर असलेल्या कोठी परिसरात सापडल्या आहेत.या प्रकाराची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी तसेच बॉम्ब शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.या गोळ्या कुठून या ठिकाणी आल्या आहेत आणि कोणी आणल्या आहेत याचा तपास पोलिस करणार आहेत.
सध्या उन्हाळा चालू असून गरम वातावरणामुळे यातील काही गोळ्यांचा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने शहरांमध्ये एक खळबळ उडाली आहे.ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.