Maharashtra247

नगर जिल्‍ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर तब्बल ६१ कोटी रुपयांचे अनुदान थेट खात्यात वर्ग

नगर (दि.७ प्रतिनिधी):-राज्‍य सरकारच्‍या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतक-यांना झाला असून,या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतक-यांच्‍या बॅक खात्‍यात वर्ग झाले आहेत.राज्‍य सरकारच्‍या वतीने दूध उत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्‍याकरीता ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती.

मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात अडथळे निर्माण होत होते.दूग्‍ध व्‍यवसाय व पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने अनुदानासाठी लावण्‍यात आलेल्‍या अटी आणि नियमांमध्‍ये शिथीलता केल्‍यामुळे अनुदान शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात मोठी मदत झाली. जिल्‍ह्यातील ६७ हजार शेतक-यांना थेट लाभ मिळाला असल्‍याची माहीती विभागाच्‍या वतीने देण्‍यात आली.अकोले तालुक्‍यातील २ हजार ७२५ शेतक-यांना १५ कोटी २४ लाख ९६ हजार, संगमनेर तालुक्‍यातील १७ हजार ११९ शेतक-यांना १२ कोटी १० लाख ६३ हजार, कोपरगाव तालुक्‍यातील ७ हजार ९२ शेतक-यांना ५ कोटी १६ लाख १२ हजार, राहाता तालुक्‍यातील १२ हजार ५ शेतक-यांना ११ कोटी ६० लाख ६७ हजार, श्रीरामपूर तालुक्‍यातील ६ हजार ४५४ शेतक-यांना ५ कोटी ८२ लाख ३१ हजार, नगर तालुक्‍यातील २ हजार १३८ शेतक-यांना २१ कोटी ५५ लाख ७ हजार, नेवासा तालुक्‍यातील ४ हजार ६८ शेतक-यांना ४ कोटी ८२ लाख ४० हजार, पारनेरमध्‍ये ५ हजार ८१४ शेतक-यांना ४ कोटी ८२ लाख ४० हजार, पाथर्डी तालुक्‍यातील २७८ शेतक-यांना २ कोटी ७५ लाख ३४ हजार, राहुरी तालुक्‍यातील १२ हजार ५ शेतक-यांना ११ कोटी ६० लाख ६७ हजार आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील ६ हजार ४५४ शेतक-यांना ५ कोटी ८२ लाख ३१ हजार एवढे अनुदान प्राप्‍त झाले आहे.

जिल्‍ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्‍ह्यातील दूध संघाना दूध पुरवठा करत आहेत.अशा शेतक-यांची माहीती विभागाने संकलित केली असून, हे दूध उत्‍पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नयेत म्‍हणून, त्‍यांनाही अनुदनाचा लाभ मिळाला आहे. अशा शेतक-यांची संख्‍या ही २९ हजार ४४१ असून, या शेतक-यांना ५ कोटी २३ लाख ६६ हजार ९१५ रुपयांचे अनुदान मिळण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नये यासाठी विभागाने १५ एप्रिल पर्यंत मुदत वाढविली असल्‍याचेही विभागाच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

You cannot copy content of this page