
अकोले (प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील सुगाव येथे तरुण मुरघास बनविण्यासाठी धुमाळ वस्तीवर आले होते. उष्णतेमुळे सागर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड ता.सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ रा.पेमगिरी,ता. संगमनेर) हे प्रवरा पात्रातील पाझर तलावाजवळ अंघोळीसाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाझर तलावाच्या पडणाऱ्या पाण्याच्या दाबाचा व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.त्यापैकी सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागला असून अकोले ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे तर अर्जुन याचा शोध चालू असून स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईक यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.
अकोले तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफ पथकातील सहा जण गुरुवारी सकाळी बुडाले. सुगाव बुद्रुक शिवारात बुधवारी वनविभागाच्या रोपवाटिके जवळपास प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी पाण्यात दोन तरूण पाण्यात बुडाले होते.त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसर्याचा शोध सुरू होता.तरुणाच्या शोधासाठी धुळ्याहून आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक गुरुवारी सकाळी दोन बोटी घेऊन नदीपात्रात उतरले होते.मात्र नदीपात्रात मोठा भोवरा व खड्डा असल्याने यात एसडीआरएफची एक बोट पलटी होऊन शोध पथकातील पाच आणि एक स्थानिक असे सहा जण बुडाले यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एक पंकज पवार सुखरूप असल्याचे समजते.
दुसरा अशोक पवार अत्यावस्थ असून भांडकोळी रूग्णालयात उपचार घेत आहे.तर प्रकाश नामा शिंदे,वैभव सुनील वाघ,राहुल गोपीचंद पावरा या एसडीआरएफच्या तीन जवानांचे मृतदेह मिळाले आहे.पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख वाकचौरे याचा व काल बुडालेला अर्जुन रामनाथ जेडगुले याचा देखील प्रशासनाकडून शोध सुरू आहे.बंधाऱ्या लगत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अर्जुन रामनाथ जेडगुले आणि सागर पोपट जेडगुले हे दोघे पाण्यात बुडाले होते. यांच्या सोबत असलेल्या इतरांनी तसेच गावकरी, पोलीस आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी शोध सुरु केला होता.त्यांना सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह शोधण्यात यश आले होते.तर अर्जुनचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफ ची टीम बोलवण्यात आली होती.मात्र त्यानंतर मोठी दुर्घटना घडली.जिल्ह्यात अशी दुर्घटना घडल्याने शोककळा पसरली आहे.