पकडलेले दारूचे बॉक्स सोडून देण्यासाठी पोलिसाला दमबाजी….
अहमदनगर (दि.२ जून):-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अवैध दारू वाहतूकदारावर पोलिसांनी कारवाई न करताच सोडून द्यावे, अशी मागणी करत गैरकायद्याची मंडळी एकत्रित करून पकडलेले दारूचे बॉक्स सोडून देण्यासाठी पोलिसांनाच दमबाजी करत व दबाव आणून शासकीय कामात अडथळा केला म्हणून अकोला तालुक्यातील कोतूळ येथील पाच आरोपी विरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोकॉ/महिंद्र गुंजाळ यांनी फिर्याद दाखल केली.त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,कोतूळ येथे बुधवारी आठवडे बाजारात बंदोबस्तावर असताना दुपारी चारच्या सुमारास एका दुचाकीवरून देशी दारूच्या बाटल्यांनी भरलेले बॉक्स अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने एक दुचाकीस्वार शिदवड फाटा येथून कोतूळ गावाचे दिशेने येत असल्याची खबर मिळाली.वरिष्ठांच्या आदेशानुसार कोतूळ गावच्या मुळा नदीपात्रावरील पुलावर जाऊन थांबलो असता त्यावेळी विजय बाबूराव खरात हे त्याच्या दुचाकीवरून लहान मुलास पाठीमागे बसून व दोन गोण्यांतून अवैधरित्या देशी दारूसह तेथे मिळून आले.त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी मी त्यांना ताब्यात घेतले.
यानंतर विजय बाबूराव खरात यांनी त्याच्या घरी फोन करून कमल विजय खरात,सागर विजय खरात,दत्तात्रय निवृत्ती खरात,अनिल निवृत्ती खरात (सर्व रा.कोतूळ,ता.अकोले) यांना घटनास्थळी बोलावून घेतले.ते घटनास्थळी आले व मी पकडलेले अवैध दारूचे बॉक्स सोडून द्यावे, म्हणून बेकायदेशीर जमाव जमवून मला दमबाजी केली. शासकीय कामकाजात अडथळा आणला.तसेच आरोपी कमल विजय खरात व सागर विजय खरात हे माझ्या अंगावर धावून आले.त्यांनी मला ढकलून देऊन माझ्या ताब्यातील दोन बॉक्स देशी दारूने भरलेली गोणी ओढून घेऊन दुचाकीवर टाकून पळून गेले.याबाबत पोकॉ/महेंद्र जगन्नाथ गुंजाळ यांनी अकोले पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.अधिक तपास पोसई/घोडे करीत आहेत.