शहरातील माळीवाडा बसस्थानकाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव इशारे करणाऱ्या ८ महिलांना कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात
अहमदनगर (दि.२३ जुन प्रतिनिधी):-शहरातील माळीवाडा बसस्थानकाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव आणि इशारे करणाऱ्या ८ महिलांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले.शुक्रवारी (दि.२१) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
बसस्थानकाच्या बाहेर लकी लॉज ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत च्या रस्त्यावर काही महिला सायंकाळ पासून उभ्या राहत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लिल हावभाव इशारे करत असत तसेच मोठ्या आवाजात अश्लील गाणे म्हणत असतात.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड कुचंबना होत असते. अनेकदा तर रात्रीच्या वेळी प्रवाशांशी हुज्जत घालण्याचे,काही प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही घडलेले आहेत.
या महिलांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा करण्यात येत होती.शुक्रवारी (दि.२१) रात्रीही असाच प्रकार सुरु असल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली.त्यांनी तातडीने एक पथक कारवाई साठी पाठविले. या पथकाने रस्त्यावर अश्लील हावभाव करणाऱ्या ८ महिलांना पकडले.त्यांना कोतवाली पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर महिला पो.कॉ.पल्लवी सुभाष रोहकले यांच्या फिर्यादी वरून भा.दं.वि.कलम २९४ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११० चे उल्लंघन कलमान्वये कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,दिपक रोहोकले,सत्यम शिंदे तानाजी पवार,सुजय हिवाळे,अनुप झाडबुके, यांच्यासह पथकातील महिला पोलीस कर्मचारी संगीता बडे,वर्षा पंडित, पल्लवी रोहोकले,वंदना काळे,निता अडसरे, यांच्या पथकाने केली.