पोलीस शिपाई पदाकरिता मुख्यालयात ६२५ उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी
अहमदनगर प्रतिनिधी (दि.11 जानेवारी):-पोलीस शिपाई पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीला 676 उमेदवारांनी हजेरी लावली तर 324 जण गैरहजर राहिले. 51 जणांना अपात्र ठरविले. 625 उमदेवारांनी मैदानी चाचणी दिली.नगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई,चालक पदाच्या 139 जागेसाठी 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. मंगळवारी चाचणीसाठी एक हजार मुलांना बोलविण्यात आले होते. पहाटे पाच वाजता मैदानावर चाचणीला सुरूवात झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह अधिकारी, अंमलदार यांनी चाचणी प्रक्रिया सुरू केली. मंगळवारी चाचणीसाठी 676 उमेदवारांनी हजेरी लावली. सुरूवातीला कागदपत्रे पडताळणी, छाती, उंचीचे मोजणी करण्यात आली. यामध्ये 51 जणांना अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित 625 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. गोळा फेक, 100 मीटर व 1600 मीटर धावणे अशी मैदानी चाचणी पार पडली. बुधवार, गुरूवार या दोन दिवस मुलांसाठी मैदानी चाचणी होणार असून शुक्रवार व शनिवारी मुलींना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.