उसाच्या ट्रकवर पाठीमागील बाजूने मोटारसायकल धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा….
श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.1 डिसेंबर):-नेवासा मार्गावर श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील अन्नपुर्णा मंगल कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या उसाच्या ट्रकवर पाठीमागील बाजूने मोटारसायकल धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.यात गणेश राजेंद्र ससाणे रा.वॉर्ड क्र.3.श्रीरामपूर व योगेश अशोक यादव रा. मुकींदपूर ता. नेवासा अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.दि.30 नोव्हेंबरच्या दुपारपासून भोकर शिवारातील अन्नपुर्णा मंगल कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध एमएच 18 एम 8962 या क्रमांकाचा उसाने भरलेला ट्रक उभा होता.या ट्रकच्या मागील बाजूचे पाटे तुटल्याने तो कलंडण्याची शक्यता असल्याने तातडीने जेसीबी बोलावून ट्रकला आधार दिलेला होता.दुसऱ्या ट्रकमध्ये या बिघाड झालेल्या ट्रक मधील ऊस भरण्याचे काम सुरू होते.दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नेवासा कडून येत असलेली मोटारसायकल (क्रं.एमएच 17 सीयु 3284) नेवाशाकडून श्रीरामपूरला येत असताना या उभ्या ट्रकवर पाठीमागून धडकली.यात श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्र.3 मधील दत्तनगर परिसरात राहत असलेला तरुण गणेश राजेंद्र ससाणे व नेवासा तालुक्यातील मुकींदपूर येथील योगेश अशोक यादव दोघेही गंभीर जखमी झाले, तयातील एकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर दुसर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या अपघातात मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अपघातादरम्यान राज्य मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.अपघात घडल्याचे समजताच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो.नि.ज्ञानेश्वर थारोत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पो.ना. चाँद पठाण, पो.ना.प्रशांत रननौरे, पो.ना.अनिल शेंगाळे व पोलीस मित्र बाबा सय्यद यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत रुग्णवाहिका पाचारण करत जखमींना उपचारासाठी साखर कामगार हॉस्पीटलमध्ये दाखल केले.तसेच राज्यमार्गाचे दुतर्फा खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.