दि.२० जानेवारी
नळदुर्ग प्रतिनिधी(अजित चव्हाण):-तुळजापूर तालुक्यातील वसंतनगर नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मेळावा हळदीकुंकू व तिळगुळ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्ग नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा झिम्माबाई राठोड या होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवी माणिक राठोड, उपाध्यक्ष रेश्मा मोहन राठोड, सदस्या ज्योती दगडू पवार, आम्रपाली शिवाजी लोंढे, सुनिता पवार, लक्ष्मी पवार, मनीषा राठोड, उषा राठोड हे होते महिला मेळाव्याची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक आर.आय.औसेकर व शाळेतील पहिलीच्या वर्ग शिक्षिका व्ही.एल. वाघमारे यांनी उपस्थित अध्यक्ष व प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व महिलांचे हळदी कुंकू लावून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी सुरेल व सुंदर आवाजात अभिनयुक्त स्वागत गीत सादर केले. स्वागत गीतानंतर शाळेचे मुख्याध्यापक आर आय औसेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी शाळेतील विविध शालेय, सहशालेय उपक्रमांची पालकांना सविस्तर माहिती दिली, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या विविध लाभार्थी योजना बद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षक व पालक यांनी एकमेकांच्या सहकार्याने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली व महिला मेळाव्याचे प्रयोजन सांगितले तसेच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हळदीकुंकू व तिळगुळ कार्यक्रमाचे औचित्य व उद्दिष्ट विशद केले.यावेळी शा.व्य.स.सदस्या ज्योती पवार, आम्रपाली लोंढे, उपाध्यक्षा रेश्मा राठोड,लोंढे इत्यादींनी समयोजित भाषणे केली.नंतर उपस्थित सर्व महिलांना शाळेच्या वतीने पेन, हळदीकुंकू व तिळगुळ देऊन सन्मान करण्यात आला.उपस्थित सर्व महिलांनी महिला मेळाव्याबद्दल व हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे व्ही.एल.यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक एच.एम सुरवसे ई.एम शिरगुरे,बी.टी.वायकर,एस.जी.कुलकर्णी शालेय पोषण आहार कर्मचारी सविता लक्ष्मण चव्हाण इत्यादींनी परिश्रम घेतले.
