अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील चास शिवारात अनोळखी व्यक्तीच्या खुनाच्या गुन्हयाची उकल 15 दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केली आहे.बातमीची हकिगत अशी की,दि. 17/02/2025 रोजी हॉटेल स्वामी समर्थ,अहिल्यानगर पुणे महामार्गावर भोयरे पठारकडे जाणारे रोडवर अनोळखी मृतदेह पडलेला असलेबाबत मिळालेल्या माहितीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणेत अकस्मात मृत्यू रजि.नं.19/2025 प्रमाणे नोंद करण्यात आली होती.
अकस्मात मृत्यूचा तपास व वैदयकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायावरून अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून मयताचा रूमालाने गळा आवळून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भोयरे पठारकडे जाणारे कच्च्या रोडला टाकुन दिला.याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गुरनं 91/2025 बीएनएस कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचे ठिकाणी भेट देऊन,स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून,गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले. त्यानुषंगाने पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथक नेमुण गुन्ह्यातील पिडीताचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.तपास पथकाने गुन्हयाचे घटना ठिकाणी भेट देऊन,अहिल्यानगर पुणे महामार्गावरील घटनास्थळाकडे येणारे जाणारे रस्त्यांवरील 40 ते 50 हॉटेल,धाबे येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयीत वाहने निष्पन्न करून गुन्हयांचे अनुषंगाने पडताळणी केली.
तपासामध्ये घटना ठिकाणपासुन अहिल्यानगरच्या दिशेने 4 कि.मी.अंतरावर अपघातग्रस्त बेवारस वाहन मिळून आले.बेवारस वाहनाची माहिती प्राप्त करून त्याद्वारे सदरची मोटार सायकल ही सुनिल बाबुराव काळे, (रा.कुंभेफळ,संभाजीनगर) हा वापरत असल्याचे निष्पन्न करून त्याचे नातेवाईक यांचेशी संपर्क साधुन मयत हा सुनिल बाबुराव काळे, रा.कुंभेफळ, ता.छ.संभाजीनगर हा असल्याची ओळख पटविली. पथकाने मयत हा छ.संभाजीनगर येथून हॉटेल स्वामी समर्थ,चास ता.अहिल्यानगर येथे आलेला असल्याने छ.संभाजीनगर ते चास व चास ते सुपा टोलनाका येथील हॉटेल साई दरबार पर्यतच्या महामार्गावरील 171 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली.पथकाने सातत्याने सलग 15 दिवस तपास करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर,रा.हॉटेल साईदरबार,सुपा टोल नाका, सुपा,ता.पारनेर मुळ रा.बिजमाई ता.जि.आग्रा,उत्तरप्रदेश राज्य यास निष्पन्न केले.पथकाने आरोपी नामे खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर, वय 22, मुळ रा.बिजमाई, ता.जि.आग्रा,उत्तरप्रदेश यांचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आग्रा,उत्तरप्रदेश राज्य येथे शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी हा हॉटेल साई दरबार येथे कामास होता. दि.17/02/2025 रोजी मयत हॉटेल साई दरबार,सुपा टोलनाका,ता.पारनेर येथे दारू पिण्यासाठी थांबलेला असताना आरोपी व मयत हे एकत्र दारू पिले.त्यावेळी मयत याने आरोपीस राहण्याकरीता रूमबाबत विचारणा केली. आरोपी हा मयतास रूम दाखविण्यासाठी मोटार सायकलवरून जात असताना मयत याने दारूच्या नशेमध्ये आरोपीस शिवी दिली याचा आरोपीस राग आल्याने त्याने मयताचा रूमालाने गळा आवळून मारल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदर कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात, पोसई/राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार बिरप्पा करमल,हृदय घोडके,फुरकान शेख,विश्वास बेरड,अरूण गांगुर्डे,सागर ससाणे,सागर मिसाळ,रोहित येमुल,मेघराज कोल्हे,उमाकांत गावडे,अरूण मोरे यांनी केलेली आहे.