संगमनेर प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव:-हिवरगाव पावसा येथे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनला वीरांचा पाडवा हा सण पारंपारिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.धुलिवंदनाच्या दिवशी आनंदोत्सव असणारा हा सोहळा गावांमध्ये दरवर्षी साजरा केला जातो.या उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे.येथील हनुमान मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असल्याकारणाने लहान-मोठे सर्वजण वीरांचा वेश परिधान करून,गावामध्ये मिरवणूक होते.भगवंताला स्मरण करून,जवळ घेऊन वीर नाचवले जातात.वीर पुरुषाचे स्मरण,आपल्या घराण्याचा मूळ पुरुष व या मूळ पुरुषाचे स्मरण व मूळ पुरुषाची पूजा म्हणजेच वीरांचा पाडवा होय.
या वीर पाडव्यानिमित्त कलावंतांनी पारंपारिक वेशभूषा करून लोककलेतून प्रबोधन व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.धुलीवंदन निमित्त वीर पाडवा कार्यक्रमाचे आयोजन हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी केले होते. गावातील भजनी मंडळ आयोजित भजनांच्या कार्यक्रमाने वातावरण भक्तीमाय,संगीतमय बनले होते.कलावंत देवराम पावसे व दत्तू पावसे यांनी भारुडाच्या माध्यमातून लोककलेतून प्रबोधन व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर व कलाभूषण लहुजी भालेराव यांच्या समृध्द कलेचा वारसा असलेल्या हिवरगाव पावसा कला नागरीत पारंपारिक लोककलेचे कार्यक्रम आजही आपले वेगळेपण टिकवून आहे.
या वर्षी विरांचा पाडवा अतिशय मंगलमय,उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.विरांचा पदन्यास पाहण्यासाठी हनुमान मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळातही तेवढ्याच आनंदाने व भक्तिभावाने साजरी केली जाते.सण व संस्कृती टिकवण्यासाठी पारंपारिक पद्धतीत थोड्याफार प्रमाणात जरी बदल झाला असला तरी त्याचा उत्साह मात्र आजही टिकून असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत होते.नामदेव पावसे,मच्छिंद्र गडाख,वसंत गडाख,देवराम पावसे,जिजाबाई गडाख,वच्छला पावसे,भिका पावसे,नामदेव शिंदे,यांच्या सह भजनी मंडळाचे सर्व सदस्य तसेच सरपंच सुभाष गडाख,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,जेष्ठ संपादक यादवराव पावसे,देवगड देवस्थानचे अध्यक्ष तथा वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे,देवगड खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त उत्तम जाधव,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,भाजपा कार्यकर्ते केशव दवंगे,विलास पावसे,दशरथ गोसावी यांच्या सह लहान मुले व हिवरगाव पावसा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.